• बुधवारी पुन्हा घरफोडीचा प्रयत्न ; चोरटा सीसीटीव्हीत कैद

बेळगाव : शहरातील कुमारस्वामी ले-आऊट परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या प्रयत्नांच्या घटना वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री एका घरफोडीच्या प्रयत्नाची घटना समोर आली असून, संशयित व्यक्तीची हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या भागात गेल्या काही महिन्यांपासून बंद घरांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. परिसरात यापूर्वीही अनेक वेळा घरफोडीचे प्रयत्न झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बुधवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांकडे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, संवेदनशील भागांवर अधिक लक्ष ठेवणे आणि संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

परिसरातील काही नागरिकांनी रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. विशेषतः ले-आऊटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.