• कल्लोळ येथे ७८ हजार क्युसेक पाण्याची आवक
  • अनेक गावांचा संपर्क तुटला, प्रशासन सतर्क

चिक्कोडी : पश्चिम घाट परिसरासह महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, कल्लोळ बंधाऱ्याजवळ नदीत तब्बल ७८ हजार क्युसेक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. नदीची पाणीपातळी अवघ्या एका दिवसात सुमारे पाच फुटांनी वाढल्याने चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील सात प्रमुख पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कृष्णा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धास्ती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग कायम असल्याने नदीच्या खोऱ्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

येडूर–कल्लोळ, मांजरी–सौंदत्ती, करदगा–भोज, मलिकवाड–दत्तवाड, सिद्धल–अक्कोळ, ममदापूर–हुन्नरगी आणि बारवाड–कन्नूर हे सात सखल पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास करू नये तसेच नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.