• चिक्कोडी विभागात हाय अलर्ट ; दहा प्रमुख पूल पाण्याखाली
  • नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा इशारा

चिक्कोडी : महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कृष्णा आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचा प्रवाह कायम असल्याने चिक्कोडी विभागात पूरस्थिती अद्याप कायम आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात सध्या सुमारे १ लाख ३० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख पाणलोट क्षेत्रांमध्ये कोयना येथे २ मिमी, नवजा येथे १ मिमी आणि महाबळेश्वर भागात ९ मिमी असा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत किंचित घट झाली असली तरी पूरस्थितीत कोणताही मोठा फरक पडलेला नाही.

नद्यांना आलेल्या पुरामुळे चिक्कोडी विभागातील १० प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी अनेक गावांचा थेट संपर्क तुटला असून नागरिकांना आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.