बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या (डी.वाय.ई.एस.) क्रीडा वसतिगृहात प्रशिक्षण घेणाऱ्या चार कुस्तीपटू मुलींची 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अभिनंदन निवड झाली आहे.

सदर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा येत्या 20 ते 24 जून 2025 या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बेळगावच्या डीवायईएस क्रीडा वसतिगृहातील संध्या शिरहट्टी हिची 42 किलो वजनी गटात, नंदिनी हिची 54 किलो वजनी गटात, सानिका हिरोजी हिची 58 किलो वजनी गटात आणि श्रावणी तारळे हिची 62 किलो वजनी गटात निवड झाली आहे. या चारही खेळाडूंना एकलव्य पुरस्कार विजेत्या कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि मंजुनाथ मादार यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तसेच जिल्ह्याचे उपसंचालक डी.डी. श्रीनिवास यांचेही या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे. पै. संध्या, पै. नंदिनी, पै. सानिका आणि पै. श्रावणी या चौघींच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे बेळगाव जिल्ह्याचे नांव राष्ट्रीय स्तरावर आणखी उंचावले आहे.