• गोकाक ग्रामीण पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

भरदिवसा बंद घरांना लक्ष्य करून सोने आणि रोख रक्कम चोरून धाडसी घरफोड्या करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून गोकाक ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याकडून कार, दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. रामचंद्र उर्फ रामसिद्ध फकिराप्पा तलवार (वय १९ वर्षे , रा. मोहरे ता. बैलहोंगल) व नागराज शिवलिंग मागेरी (वय २१ रा. कोल्लानट्टी ता. बैलहोंगल) अशी अटक केलेल्या आरोपींचा नावे आहेत.

या चोरट्यांनी दि. २९ एप्रिल रोजी गोकाक तालुक्याच्या मिडकनहट्टी गावातील महादेव पांडप्पा सवसुद्दी यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तसेच तिजोरीचा दरवाजा तोडून १५० ग्रॅम सोने आणि २०,००० रु. रोख रक्कम लंपास करून पळ काढला होता. याप्रकरणी बेळगावचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून डीवायएसपी रवी डी.नायक, सीपीआय सुरेश बाबू , ग्रामीण पीएसआय किरण मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यामध्ये अतिरिक्त जिल्हापोलीस प्रमुख श्रुती यांच्यासह एल. एल. कप्तुन्नावर, बी. व्ही. निर्ली, कुमार पवार, जगदीश गुदली, मारुती पडल्ली, आर. के. उदपुडी, डी. जी. कोन्नूर, एन. एल. मांगी, डी. बी. अंतरगट्टी, एम. बी.नायकवडी, एच. डी. गौड, व्ही. एल. नायकवडी, डी. खोतूर, डी. बी. मानप्पागोळ, शिवानंद कल्लोळी, पी. एस कडगी, सचिन पाटील आणि बेळगाव सीईएन पोलीस विभागाचे विनोद ठक्कण्णावर आदींनी सहभाग घेतला होता. बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गोकाक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.