• एक बालक गंभीर जखमी

गोकाक : तालुक्यातील कोन्नूरजवळ वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिडकल येथून गोकाककडे जाणारी एनडब्ल्यूकेएसआरटीसीची बस आणि गोकाक फॉल्स परिसरातील पॉर्बस शाळेतून कोन्नूरकडे निघालेली दुचाकी यांच्यात हा भीषण अपघात झाला.

या दुर्घटनेत सैफ मुल्ला (२९), त्यांची चार वर्षांची मुलगी सिजा मुल्ला (४) आणि त्यांचा मित्र इम्तियाज बडगाव (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील जिहान शाहरुख कुडचीकर हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर बसचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार बसचालकाचा शोध सुरू आहे. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस तपास सुरू आहे.