बेळगाव : शहरातील खंजर गल्ली परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर ‘मार्केट’ पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खंजर गल्लीतील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या प्रकरणी साकिब मोहम्मदअली अड्डवाले (वय ३०, रा. दरबार गल्ली, बेळगाव) आणि फहीम जलानी कोतवाल (रा. खंजर गल्ली, बेळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आर्थिक फायद्याच्या उद्देशाने आकड्यांच्या चिठ्ठ्यांद्वारे मटका जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून १ हजार २१० रुपये रोख आणि जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या.
यासंदर्भात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ नोंदवण्यात आला आहे. कर्नाटक पोलीस कायदा कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कारवाईत सहभागी पीएसआय मणिकांत पुजारी यांच्यासह पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.







