• १० हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
  • नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याचा पाय फ्रॅक्चर

खानापूर : शहरातील विद्यानगर रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १० ते १५ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

घटनेनंतर जखमींना तातडीने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी नगरपंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले. मात्र, या कारवाईदरम्यान कुत्र्याने प्रेमानंद नाईक यांच्यावर हल्ला केल्याने ते खाली पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांच्यावर खानापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. या झटापटीत तीन कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात आरती सुतार (वय २१), ज्योती सुतार (वय २५), विठ्ठल सुतार (वय ७०), पार्वती दाभिलकर (वय ७०), निसार अहमद बचोळी (वय ७६) आणि सुप्रिया पाटील (वय २७) यांना कुत्र्याने घरात घुसून चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बेवारस कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा, अन्न आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले असतानाही याबाबत प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विद्यानगर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.