- अखिल कर्नाटक किसान संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- आठ दिवसांत निर्णय न झाल्यास ८ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा
बेळगाव : खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी अखिल कर्नाटक किसान संघाने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
खानापूर तालुक्याच्या जवळ असलेल्या अळनावर आणि कित्तूर तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. मात्र, खानापूर तालुक्याला या यादीतून वगळण्यात आल्याने सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये भरपाई द्यावी, उसाला प्रतिटन सहा हजार रुपये दर निश्चित करावा आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यासोबतच मलप्रभा नदीवर धरण बांधून तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांना दररोज सात तास थ्री फेज वीजपुरवठा करावा, वीज क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे आणि खानापूर तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
- आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन
येत्या आठ दिवसांत खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत निर्णय न झाल्यास ८ ऑक्टोबर रोजी लिंगनमठ क्रॉस येथे राज्य महामार्गावर रात्रंदिवस धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा किशोर मिठारी यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेले निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अशपाक अहमद पटेल, दयानंद गुपित, गोपाळ वीरापूर, लक्ष्मण चन्नापूर, कुतुबुद्दीन शेख, बिष्टप्पा सुंबळी, सेबॅस्टिन सोझ, गोपाळ अगसीमणी, अंतोन सोझ, पॉल फर्नांडिस यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.








