कोल्हापूर : येत्या १९ आणि २० जून रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची भेट घडवून द्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र खासदार तथा तज्ञ समितीचे सदस्य धनंजय महाडिक यांना देण्यात आले.

पत्रात नमूद केले आहे की आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावाद सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली आहे आणि त्यात यशस्वी झाले आहेत. त्याच पद्धतीने कर्नाटक महाराष्ट्र मधील सीमाप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच २०२२ मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत सीमाभागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही निर्णय घेतले होते, जसे की दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची समिती नेमणे, परिस्थिती जैसे थे ठेवणे, परिस्थितीवर देखरेखीसाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक करणे आणि इतर. पण त्यावर अजूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे सर्व प्रश्न, आणि इथल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची भेट घडवून द्यावी म्हणून निवेदन पत्र देण्यात आले.

यावर बोलताना खा.धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, आणि भविष्यात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक किरण नकाते उपस्थित होते. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, राजू कदम, आशिष कोचेरी यांनी निवेदन सादर केले.