- राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक
बेळगाव / प्रतिनिधी
कस्तुरबा रोड, बेंगळूर येथील कर्नाटक ॲम्येचुअर बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप – २०२५ या मुष्टियुद्ध स्पर्धेत बेळगावच्या केदार वैजनाथ डंगरले याने आपल्या गटात प्रथम क्रमांकसह सुवर्ण पदक पटकावले असून त्याची आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेंगळूर येथे कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेतील ७५ ते ८० किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून बेळगावच्या केदार वैजनाथ डंगरले यांनी प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक प्राप्त केले. या सर्वोत्तम कामगिरीमुळे आता त्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. केदार याला आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि माजी आंतरराष्ट्रीय बॉक्सर मुकुंद किल्लेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील सुयश आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल केदार डंगरले याचे क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.