अथणी / वार्ताहर
विजयपुर-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर अथणी येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री एक लॉरी, पिकअप ट्रक, इनोव्हा आणि स्कॉर्पिओमध्ये हा अपघात झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाताडे (३०), शिरोळ तालुक्यातील पुडवाड गावातील शिवम युवराज चव्हाण (२४) आणि सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील सचिन विलास माळी (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. अथणी येथील बणजवाड कॉलेजजवळ ही दुर्घटना घडली.
सुरुवातीला कागवाड बाजूने लाल विटा वाहून नेणारी लॉरी आणि अथणीहून कागवाडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनात हा अपघात झाला. जखमी चालक आणि क्लिनर मदतीसाठी याचना करत होते. हे पाहून स्कॉर्पिओ चालकाने आपले वाहन बाजूला केले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु अथणीकडून येणाऱ्या इनोव्हा कारने त्यालाच धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अथणी सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.