बेळगाव : कर्करोगाने त्रस्त डॉक्टरने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.आत्महत्या करणारे डॉक्टर दिनेश लक्ष्मण भटकळ (७९) हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे रहिवासी होते आणि बेळगावमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावली होती. समाजात त्यांच्या साध्या आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे, ते वैद्यकीय क्षेत्रातही आदरणीय होते. डॉ. भटकळ यांनी त्यांच्या घरातील बाल्कनीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे रहिवासी घटनास्थळी धावून आले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
त्यांनी आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.पोलिस आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.








