• महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची माहिती
  • घरबसल्या मोबाईलवरून भरणे शक्य
  • बल्क एसएमएस, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि बीबीपीएसचा समावेश
  • नागरिकांचा वेळ वाचणार 

बेळगाव : मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने तीन डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बल्क एसएमएस, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) या माध्यमांतून नागरिकांना घरबसल्या मोबाईलद्वारे कर भरण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊन करदात्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

महापालिकेत आयोजित माहितीपर कार्यक्रमात बोलताना आयुक्तांनी या सुविधांची माहिती दिली. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले असून, त्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महानगरपालिका हद्दीत सुमारे १ लाख ७१ हजार मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना बल्क एसएमएसद्वारे करासंदर्भातील माहिती पाठविण्यात येणार आहे. या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मालमत्तेवरील थकीत कराची माहिती मिळवून त्याचा भरणा करता येईल.

व्हॉट्सॲप चॅटबॉटसाठी 7090022888 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेद्वारे यापूर्वी भरलेला कर, थकीत कर आणि चालू आर्थिक वर्षात भरावयाच्या कराची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे, थकीत कराचा भरणा केल्यानंतरच चालू वर्षाचा कर भरण्याची प्रक्रिया पुढे नेता येणार आहे.

तिसरी सुविधा असलेल्या बीबीपीएसच्या माध्यमातून पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या डिजिटल पेमेंट ॲपद्वारे कर भरता येणार आहे. घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक मालमत्ताधारकांनाही या सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी उत्तर, दक्षिण, मध्य, बेळगाव-१ किंवा अन्य संगणक केंद्रांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

या तिन्ही सुविधांचा वापर करून नागरिकांना करासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्यासह मोबाईलवरूनच कराचा भरणा करता येणार आहे. त्यामुळे वेळेत कर भरणे अधिक सोयीचे होणार आहे.

नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि नियमितपणे कर भरून आदर्श करदाता बनावे. शहरातील विकासकामे ही नागरिकांकडून जमा होणाऱ्या करावर अवलंबून असल्याने प्रत्येकाने वेळेत कर भरून शहराच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.

यावेळी महसूल शाखेचे उपआयुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, विकास शाखेच्या उपआयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.