- दोन नोव्हेंबरपासून निवडणुकांसाठी गावोगावी जनजागृती
बेळगाव : काळ्या दिनाच्या निषेध मोर्चाला परवानगी मिळाली किंवा नाही, तरी १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत काळ्या दिनाच्या नियोजनासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सीमाप्रश्नाच्या लढ्याला ७० वर्षांची परंपरा असून, यंदाही काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काळ्या दिनाच्या निषेध मोर्चात बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिकांनी एकजुटीने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. उपआयुक्तांच्या वक्तव्याला कृतीतून उत्तर देण्याची भूमिकाही कार्यकर्त्यांनी मांडली.

सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा सुरू असला, तरी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनातून मराठी भाषिकांची एकजूट आणि सीमाप्रश्नावरील भूमिका अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मोर्चाच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील गावागावांत संपर्क साधून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यावर भर देण्यात आला.
काळ्या दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर २ नोव्हेंबरपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. गावागावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधणे, स्थानिक प्रश्न जाणून घेणे, निवडणूक जाहीरनामा तयार करणे आणि समितीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

समितीचे कार्यकारी अध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्यासह विविध पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. काळ्या दिनाचा मोर्चा आणि आगामी निवडणुकांची तयारी या दोन्ही बाबींमध्ये कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. सीमाप्रश्नाच्या लढ्यातील एकजूट कायम ठेवून संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.








