• महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
  • मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव

बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त आयोजित मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या बैठकीत करण्यात आले. युवा समितीच्या कावळे संकुल येथील कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठीबहुल सीमाभाग तत्कालीन केंद्र सरकारने अन्यायाने कन्नड भाषिक म्हैसूर राज्यात समाविष्ट केला, अशी मराठी भाषिकांची भूमिका आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ १९५६ पासून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. यंदाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. महाराष्ट्रात जाण्याची मराठी भाषिकांची इच्छा आजही कायम असल्याचा संदेश या माध्यमातून द्यावा, असे आवाहन अंकुश केसरकर यांनी केले.

मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या कृतीचा निषेध करणारा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत व्यापक प्रयत्न करण्याची गरज असून, मराठी भाषिकांची एकजूट आणि महाराष्ट्रात सामील होण्याची प्रबळ इच्छा दाखवण्यासाठी काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे माजी नगरसेवक राजू बिर्जे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर भडकावू पोस्ट टाळून युवकांनी लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी व्हावे. महिला आणि युवकांनीही मोठ्या संख्येने जनजागृती मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन संतोष कृष्णाचे यांनी केले.

बैठकीत अश्वजित चौधरी, सूरज चव्हाण, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे आणि आकाश भेकणे यांनी आपले विचार मांडले. उपाध्यक्ष गुंडू कदम यांच्यासह सूरज कुडुचकर, महेश जाधव, सूरज चव्हाण, सौरभ तोंडले, गजानन बैलूरकर, महेश चौगुले आणि निखिल देसाई उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.