• सोशल जस्टिस फोरमतर्फे जिल्हाधिकारी – पोलीस आयुक्तांना निवेदन
  • तुरमुरीतील कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी

बेळगाव : तुरमुरी गावातील कचरा डेपोमुळे वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असून त्यावर शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सोशल जस्टिस फोरमने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तसेच शहराच्या औद्योगिक प्रगतीसाठी सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याचीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात फोरमच्यावतीने जिल्हाधिकारी – पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. तुरमुरी येथील कचरा डेपोमध्ये अनियंत्रित व अस्वच्छ पद्धतीने कचरा टाकला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे माती व पाण्याचे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक उपाय म्हणून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, वीजनिर्मिती तसेच गांडूळ खत प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव फोरमने मांडला आहे. या उपाययोजनांमुळे कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन होऊन ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पना प्रत्यक्षात आणता येईल आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, एअर फोर्स गुरुप्रसाद कॉलनी येथे सुमारे ४० एकर जागेवर सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारल्यास बेळगावला औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रात नवी ओळख मिळेल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, असे फोरमने स्पष्ट केले आहे. यासाठी केंद्र सरकार व भारतीय हवाई दलाशी समन्वय साधून आवश्यक परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

या दोन्ही मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी संगम कुलकर्णी, शिरीष तेंडुलकर, अनिल देशपांडे, नकुल लेले, विकास कलघटगी, संतोष कामत आदी सदस्य उपस्थित होते.