• उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
  • सुवर्ण विधानसौधमध्ये विविध विभागांची प्रगती आढावा बैठक

बेळगाव : भारतीय हवामान विभागाने जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना दिले. जलाशयांमधील पाणीसाठा डेड स्टॉक पातळीवर पोहोचत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये बुधवारी आयोजित महसूल दिन – २०२६ , बेळगाव विभागातील हवामानाचा आढावा आणि विविध विभागांच्या प्रगती आढावा  बैठकीत ते बोलत होते.

राज्यात यंदा मान्सूनचा वेग मंदावला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार टँकर आणि खासगी बोअरवेलच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कालव्यांमधील पंपसेट सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबरोबरच पाणीटंचाईसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पावसाअभावी जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात पुरेसा चारा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

डॉ. परमेश्वर यांनी आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याचे निर्देश दिले. बेळगाव जिल्ह्यात ३४, विजयपूरमध्ये २४, बागलकोटमध्ये ५, धारवाडमध्ये २७, गदगमध्ये २५, हावेरीमध्ये ११ आणि उत्तर कन्नडमध्ये १० डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती देत, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कुमार कटारिया, युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नवीन राज सिंग, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज कुमार मीना, पशुसंवर्धन विभागाच्या सचिव विनोद प्रिया, महसूल आयुक्त मीना नागराज, सर्वेक्षण व भूमी अभिलेख आयुक्त व्यंकटराजा, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आयुक्त होन्नंबा, महसूल विभागाच्या प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम., पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त शिल्पा नागराज, तसेच बेळगाव विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.