• बेळगाव पोलिसांचा इशारा

बेळगाव : टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने स्थान मिळवल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ३१ मे रोजी अंतिम सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुका, विजय उत्सव किंवा रस्त्यावर होणाऱ्या जल्लोषाला परवानगी दिली जाणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी सामना दाखविण्यासाठी एलईडी स्क्रीन किंवा वॉल उभारायची असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय आधीपासून उभारलेल्या बाह्य एलईडी स्क्रीनवर सामना प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

फटाके फोडणे, धोकादायक वस्तूंचा वापर करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, दुचाकी किंवा वाहनांच्या रॅली काढणे, बेफाम वेगाने वाहन चालविणे, स्टंट करणे, विनाकारण हॉर्न वाजविणे अथवा रस्त्यांवर गर्दी करून गोंधळ घालणे यासारख्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, भांडणे, असभ्य वर्तन करणे किंवा कोणत्याही प्रकारे शांतता भंग करणाऱ्या कृतींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा, द्वेषपूर्ण संदेश किंवा चिथावणीखोर पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरोधातही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रतिस्पर्धी संघांच्या समर्थकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्ये किंवा चिथावणीखोर वर्तन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामन्यानंतर शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून १५ अल्कोमीटरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाईल. तसेच धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’ तैनात राहणार आहे. कारवाईदरम्यान पोलिसांकडून बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचाही वापर केला जाणार आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केल्यास १५ हजार रुपयांचा दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास तसेच वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.