• १ लाख २२ हजारांची रोख रक्कम जप्त

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत १० जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी पैशांची पैज लावून ‘अंदर-बाहर’ हा जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून ₹१ लाख २२ हजार १६ रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

शगणमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान चेतन चंदगडकर, संतोष कोलकार, रमजान मुल्ला, खतलहृद बक्षी, मुदस्सर मुजावर, बालकृष्ण नाईक, आसिफ भगवान, रिझवान भगवान, सरफराज किल्लेदार आणि सय्यद युसूफ इनामदार यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

मात्र, कारवाई सुरू असताना सचिन शिंदे हा आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी यशस्वी कारवाईबद्दल हिरेबागेवाडी पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे.