बेळगाव : दसरा आणि दिवाळीसारखे सण जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी साजरे केले जातात. हा आनंद आणि उत्साह प्रत्येकाच्या जीवनात कायम राहावा, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रबोधनकार भाई शंकरराव बांदकर यांनी केले.

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, अंधार हे अज्ञानाचे प्रतीक आहे, तर प्रकाशामुळे अंधार दूर होतो. त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त झाल्यावर मनातील अज्ञान नाहीसे होते. जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी ईश्वराचा साक्षात्कार होणे आवश्यक असून, त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

विजयादशमी म्हणजे दहा इंद्रियांवर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारी तिथी आहे, असे सांगून त्यांनी दैनंदिन जीवनात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले. उठताना, बसताना, जेवताना, पिताना, झोपताना आणि प्रत्येक कृती करताना नामस्मरण करावे. नामस्मरणामुळे जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते, असे त्यांनी सांगितले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्वही विशद केले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चिटणीस अनंत लाड यांच्या स्वागताने झाली. यावर्षी घुमटमाळ मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात प्रवचनाच्या कार्यक्रमाने करण्यात आल्याची माहिती लाड यांनी दिली. अध्यक्ष कुलदीप भेकणे आणि उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. खजिनदार रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले, तर मधुरा शैलेश शिरोडकर यांनी जीवनविद्या मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी मंदिराचे ट्रस्टी, जीवनविद्या मिशनचे नामधारक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्त शनिवारी सायंकाळी आयोजित सामूहिक हनुमान चालीसा पठणात अनेक महिलांनी सहभाग घेतला.