बेळगाव : विजयादशमी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठेत सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील काकतीवेस परिसरात दसरा पूजेसाठी आवश्यक असलेले ऊस, फुले आणि आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. सणाच्या उत्साहामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

काकतीवेस बाजारात उसाची जोडी ४० रुपये, तर फुलांची विक्री ३० ते ५० रुपये दराने सुरू आहे. दसऱ्याच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात येत असून, वस्तूंचे दर जाणून घेत खरेदी केली जात आहे. ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये दरांबाबत मोलभावही सुरू असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूजेच्या साहित्याला मागणी वाढली असून, फुले, ऊस आणि आपट्याच्या पानांच्या खरेदीत नागरिक व्यस्त आहेत. पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. सणानिमित्त बाजारपेठेत वाढलेली वर्दळ आणि खरेदीची लगबग यामुळे काकतीवेस परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे.