बेळगाव / प्रतिनिधी
हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या वेळी केलेल्या चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट अर्थात उच्चदाबाचा वीज प्रवाह निर्माण होऊन अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कांही घरे आणि दुकानांमधील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरातील वीजपुरवठा काल रविवारी सकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे विजेच्या खांबावरील आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमने दुपारी आपले दोन नवीन लाईनमन चौथा रेल्वे गेटच्या रस्त्याकडे पाठवले होते. तथापि दुरुस्ती करताना या नवीन लाईनमन्सनी वायरिंगची उलटसुलट चुकीची जोडणी केल्यामुळे मुख्य तारांमधून हायव्होल्टेज अर्थात विजेचा उच्चदाबाचा प्रवाह निर्माण झाला. या पद्धतीने अचानक उच्चदाबाचा वीज पुरवठा झाल्यामुळे जवळपासच्या सुमारे आठ – दहा घरे, दूध डेअरी, हॉटेल आणि दुकानांमधील टीव्ही, फ्रिज, पंखे, कॉम्पॅक्ट सिस्टीम, वीज मीटर सीसी कॅमेरे वगैरे उपकरणे जळून मोठे नुकसान झाले.