- ४५ वृक्षांची लागवड ; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
बेळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाही व्हाईब्स आणि अमूल्य बूंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील निडगळ (बरगाव) येथील माध्यमिक विद्यालयात ‘गुरुवनम्’ या विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणालाही गुरु मानण्याचा संदेश देत विविध प्रकारच्या ४५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
उपक्रमाअंतर्गत स्थानिक हवामानाला पूरक सावलीची झाडे, कुंपणासाठीची झाडे, फुलझाडे, शोभेची झाडे आणि इतर विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. वृक्षारोपणाचा उद्देश केवळ अधिकाधिक झाडे लावणे नसून, लावलेले प्रत्येक रोप जगविणे हा असल्याने प्रतीकात्मक स्वरूपात ४५ रोपांची लागवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी शाळेतील शिक्षकांच्या निस्वार्थ सेवेलाही विशेष गौरव करण्यात आला. अत्यल्प मानधनावर, तर काही शिक्षक विनामोबदला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असल्याचे पाहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान होणे ही काळाची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
या उपक्रमाला पाही व्हाईब्स फाउंडेशनचे शिवानंद हिरेमठ, विश्वनाथ हिरेमठ तसेच संस्थेच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमूल्य बूंद फाउंडेशन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.








