- निवडणूक न लढवण्याचा अर्थ निवृत्ती नाही – मंत्री यतिंद्र सिद्धरामय्या
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले, तरी त्याचा अर्थ त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असा होत नाही, असे स्पष्ट करत नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सिद्धरामय्या पुढेही दुर्बल आणि शोषितांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय राहतील, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधताना यतींद्र सिद्धरामय्या म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी केवळ निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ते सार्वजनिक जीवनात आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय राहून काँग्रेस पक्षासाठी प्रचार करणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून, चर्चेनंतर योग्य निर्णय घेऊन मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल.
नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आपण बेळगाव दौऱ्यावर आल्याचे सांगून त्यांनी महापालिका आणि शहरातील विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.
बेळगाव महापालिकेला मिळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानाबाबत विचारले असता, त्यासंदर्भात संपूर्ण माहिती नसल्याचे सांगत तपास करून आवश्यक माहिती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकप्रतिनिधी नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एल अँड टी कंपनीने खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबाबत प्रतिक्रिया देताना, चोवीस तास पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू असून ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, तेथे तातडीने योग्य दुरुस्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यासाठी आवश्यक विकासकामांचा आढावा घेऊन राज्य सरकारकडून आवश्यक निधी आणि सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही यतींद्र सिद्धरामय्या यांनी यावेळी दिली.








