• कट रचणाऱ्या मित्रांसह आठ जणांना अटक

बेळगाव : गोव्याला निघालेल्या सुवर्ण कारागिरांचे अपहरण करून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व सोने लुटणाऱ्या टोळीचा खानापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून वाहने, शस्त्रे, रोकड आणि इतर साहित्यांसह ४०.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शहापूर येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे पश्चिम बंगालचे एस. के. इबादुल यांनी तक्रार दाखल केली होती. इबादुल हे त्यांचे सहकारी रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासह कारने गोव्याकडे निघाले होते. खानापूर तालुक्यातील उचवडे गावाजवळील बैलूर क्रॉस परिसरात राष्ट्रीय महामार्ग ७४८ वर काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर तिघांना जवळच्या शेतात नेऊन पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले.

दरोडेखोरांनी इबादुल यांच्याकडील १ लाख २०० रुपये रोख रक्कम तसेच रबीयतल गाझी यांच्याकडील सुमारे २२५ ग्रॅम सोने घेऊन पलायन केले होते. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली. तपासात तक्रारदारासोबत प्रवास करणारे रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांनीच दरोड्याचा संपूर्ण कट आखल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी शहापूरमधील सादीक तोरगल याच्या मदतीने विवेक चंद्रकांत पाटील याला तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर विवेक पाटीलने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने हा दरोडा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणात रबीयतल रुहुल अमीन गाझी, अली हुसेन कविरुद्दीन मंडल, सादीक अब्दुल रहमान तोरगल, विवेक चंद्रकांत पाटील, प्रशांत महादेव चव्हाण, नितीन राजाराम चव्हाण, दिगंबर नागेश पाटील आणि मयूर राजू घाडी यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी बेळगाव परिसरातील विविध भागांतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सुझुकी ब्रेझा, एर्टिगा व अन्य एक कार, १ लाख २०० रुपयांची रोकड, देशी बनावटीचे पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल फोन, मोटारसायकल तसेच २०५ ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट असा एकूण ४० लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले.