- ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे गौरव
- शिक्षक, पालक आणि मित्रपरिवाराच्या योगदानाचे मानले ऋण
सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र विक्रम नाईक यांनी राजस्थानमधील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून गणित विषयात पीएचडी संपादन केल्याबद्दल त्यांचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. आर. पी. डी. हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे होते.
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे संस्थापक वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. गुरुवंदन कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
डॉ. विक्रम नाईक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मिलाग्रीज हायस्कूलमध्ये, बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण आर. पी. डी. ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथून बी.एस्सी. तर मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. SET, NET आणि GATE परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पिलानी येथून गणित विषयात पीएचडी मिळविली.
या यशाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि मान्यवरांच्या वतीने डॉ. विक्रम नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मिलाग्रीज हायस्कूलतर्फे जी. आर. कालकुंद्रीकर, आर. पी. डी.तर्फे प्रा. बी. आर. नंदिहळ्ळी, प्रा. अजय कामत, प्रा. संतोष पाथरवट, तर संत राऊळ महाविद्यालयातर्फे प्रा. अरुण पणदूरकर यांनी त्यांचा सत्कार केला. सावंतवाडी पतपेढी, कळसुलकर हायस्कूलसह विविध संस्था आणि मान्यवरांनीही डॉ. नाईक यांचा गौरव केला.
यावेळी गणपती कालकुंद्रीकर, उमाकांत वारंग, बाळासाहेब नंदिहळ्ळी, अरुण पणदूरकर, संतोष पाथरवट आणि अजय कामत यांनी डॉ. विक्रम नाईक यांच्या चिकाटी, जिद्द, शांत व संयमी स्वभावाचे तसेच अभ्यासातील नियोजनाचे कौतुक केले. शिक्षणासोबतच त्यांनी क्रिकेटमध्येही नैपुण्य मिळविल्याचा उल्लेख करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. विक्रम नाईक यांनी आपल्या यशामागे शिक्षक, आई-वडील, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व आशीर्वादाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
दरम्यान, वाय. पी. नाईक यांची अखिल भारतीय नाईक रामोशी बेरड समाज विकास परिषद, पुणेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला रमेश बोंद्रे, गणपती कालकुंद्रीकर, उमाकांत वारंग, जावेद शेख, प्रदीप सावंत, प्रा. अरुण पणदूरकर, प्रा. बी. आर. नंदिहळ्ळी, निलेश पारकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, एस. आर. मांगले, सुनील नेवगी, विलास कासकर यांच्यासह शिक्षक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव केंकरे यांनी केले, तर निलेश पारकर यांनी आभार मानले.








