बेळगाव / प्रतिनिधी
सह्याद्री नगर येथील आधार हॉस्पिटलच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सेवेचे अभियान राबविण्यात आले. शहरात आणि उपनगरी भागात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. आधार हॉस्पिटलच्या तज्ञ वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यामुळे रुग्णांना याचा लाभ झाला. यामध्ये रक्तदाब, मधुमेह यासह नियमित चाचण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर डेंग्यू नियंत्रणासाठी मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. सारथी नगर, सह्याद्री नगर, बॉक्साईट रोड, ओमकार नगर आणि कुवेम्पू नगर भागात ही शिबिरे पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत पाटील आणि डॉ. पी. जयमोहन यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने शिबिर संयोजनासाठी परिश्रम घेतले.








