• बेळगावकरांनी अनुभवला आकाशातील विलोभनीय नजारा
  • गणरायाच्या आगमनाच्या आनंदात खगोलीय दृश्याने घातली आणखी भर

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच सोमवारी सायंकाळी बेळगावच्या आकाशात निसर्गाचा मनमोहक अविष्कार पाहायला मिळाला. सायंकाळच्या आकाशात चंद्रकोरीसोबत शुक्राची सुंदर युती पाहायला मिळाली.

गणरायाच्या आगमनाच्या आनंदात या खगोलीय दृश्याने आणखी भर घातली. आकाशातील हे विलोभनीय दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसलेल्या या सुंदर नजाऱ्याचे नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात छायाचित्रण केले.

भक्तिमय वातावरणात आकाशात दिसलेली चंद्रकोर आणि शुक्राची ही सुंदर जोडी पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. निसर्गानेही जणू गणरायाच्या स्वागतासाठी विशेष सजावट केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त झाली.