- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मागितला न्याय
बेळगाव / प्रतिनिधी
बैलहोंगल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या वर्तणुकीचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात विषाच्या बाटल्या धरून आंदोलन केले. सुपीक जमीन नांगरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कडासगट्टी गावातील अनेक शेतकरी कुटुंबे मागील ४५ वर्षांपासून सुमारे ३० एकर गोमल जमिनीवर शेती करत आहेत. इतक्या वर्षांपासून कसणारी जमीन जमीनमालकी हक्क कायद्यानुसार त्यांच्याकडे हस्तांतरित करावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा आणि आर्थिक दबाव यामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाविरुद्ध त्यांनी जोरदार आवाज उठवला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमीन त्यांच्या नावावर नोंद करण्याऐवजी काही अधिकारी त्यांच्याकडून अवैध रीतीने पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच तहसीलदारांनी अचानक गावात येऊन जमीन रिकामी करण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप आहे.
या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनी “जमीन द्या, नाहीतर आम्हाला विष द्या” असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला. त्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी केली.
बसवराज पाटील, भारती पाटील यांसह गावातील अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला.








