बेळगाव : ईद-ए-मिलाद हा सण शांतता आणि सलोख्याचे प्रतीक असून, यंदाही सर्वांच्या सहकार्याने हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

शनिवारी (२२ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ईद-ए-मिलादपूर्व बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सणाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवर पूर्णपणे बंदी राहणार असून, स्थानिक नेत्यांनी आपल्या परिसरातील तरुणांना याबाबत मार्गदर्शन करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तसेच सजावटीच्या ठिकाणी विद्युत बिघाड होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश हेस्कॉम आणि पोलिस विभागाला देण्यात आले. दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

ईद-ए-मिलादची मिरवणूक सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी समाजातील नेत्यांना दिले.

आमदार राजू (आसिफ) सेठ यांनी गेल्या तीन वर्षांपासून बेळगावात ईद-ए-मिलादचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा होत असल्याचे सांगितले. यंदाही प्रशासन आणि पोलिस विभागाने आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवावेत तसेच रस्त्यांवरील अनधिकृत केबल्स हटवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनीही सण शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सणाच्या निमित्ताने प्रक्षोभक सजावट, पोस्टर्स किंवा बॅनर्स लावू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, जातीय सलोख्याला बाधा आणणाऱ्या अफवा किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीला उपस्थित सामुदायिक नेत्यांनी ईद-ए-मिलादचा सण शांतता आणि सलोख्याने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी विविध सूचना आणि मागण्याही मांडल्या.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. बसरगी, उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, महापालिका आयुक्त कार्तिका एम., विविध विभागांचे अधिकारी तसेच समाजातील नेते बैठकीला उपस्थित होते.