• प्रत्येकाने किमान एक अंक खरेदी करावा – डॉ. विनोद गायकवाड
  • लोकमान्य ग्रंथालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्याहस्ते दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ

बेळगाव : दिवाळी अंक हे साहित्यप्रेमींना दर्जेदार साहित्याची मेजवानी देण्याबरोबरच दीर्घकाळ वाचनाचा आनंद देतात. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी दिवाळी अंक खरेदी करून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

वरेरकर नाट्य संघ येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सदस्यांसाठी सवलतीच्या दरात दिवाळी अंक उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली. गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. विनोद गायकवाड यांच्याहस्ते या योजनेचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून योजनेची माहिती दिली. तसेच ग्रंथालयाच्या सर्व सदस्यांनी या संधीचा लाभ घेऊन दिवाळी अंकांची खरेदी करावी, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना डॉ. गायकवाड यांनी दिवाळी अंकांचे साहित्यविश्वातील महत्त्व अधोरेखित केले. नवोदित लेखक आणि साहित्यिकांना आपल्या लेखनकौशल्याला वाव देण्यासाठी दिवाळी अंक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आपणही आपल्या लेखनप्रवासाची सुरुवात दिवाळी अंकांमधूनच केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळी अंकांमध्ये कथा, कविता, विविध विषयांवरील लेख, भविष्यविषयक माहिती आणि विनोदी साहित्य अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश असतो. त्यामुळे वाचकांना एकाच ठिकाणी वैविध्यपूर्ण साहित्याचा आनंद घेता येतो, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थितांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात ६० हून अधिक दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी बुक लव्हर्स क्लबचे सदस्य तसेच ग्रंथालयाचे अन्य सभासद उपस्थित होते.

लोकमान्य ग्रंथालयातर्फे दरवर्षी राबविण्यात येणारा हा उपक्रम वाचनसंस्कृती जोपासण्याबरोबरच दिवाळी अंकांच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना विविध साहित्यकृतींचा परिचय करून देणारा ठरत आहे.