• बळ्ळारी नाला प्रकल्पग्रस्त ९५ शेतकऱ्यांना ५४ कोटींची नुकसानभरपाई
  • पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण

बेळगाव : बळ्ळारी नाला प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या कमलापूर गावातील ९५ शेतकऱ्यांचा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला नुकसानभरपाईचा संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. या शेतकऱ्यांना एकूण ५४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करून वितरित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेशांचे वितरण करण्यात आले.

बळ्ळारी नाला प्रकल्पांतर्गत जमीन पाण्याखाली गेल्याने कमलापूर गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, जमीन संपादित होऊनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करत होते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अखेर ९५ शेतकऱ्यांना ५४ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येत असल्याबद्दल जारकीहोळी यांनी समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जात असताना त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणे ही सरकारची जबाबदारी आहे. कमलापूरच्या शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने त्यांना दिलासा मिळाला असून, यापुढे ते समाधानाने जीवन जगू शकतील, अशी अपेक्षा जारकीहोळी यांनी व्यक्त केली.

दहा वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना धनादेश मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शेतकऱ्यांनी यापूर्वी आपल्या अडचणी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर विशेष प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाईचे धनादेश स्वीकारल्यानंतर कमलापूरच्या शेतकऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा सत्कार करून मिठाई देत कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या दशकभरापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल त्यांनी मंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, भूसंपादन प्रशासकीय अधिकारी शिवानंद भजंत्री, हिडकल धरण विशेष भूसंपादन अधिकारी के. चंद्रमोळी तसेच कमलापूर गावातील शेतकरी नेते उपस्थित होते.