• समस्या तातडीने न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
  • पाईपलाईन दुरुस्तीत दिरंगाई; प्रशासन आणि कंत्राटदारांवर हलगर्जीपणाचा आरोप

बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवले जात असले तरी वृद्ध, महिला आणि नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था अपुरी आणि गैरसोयीची ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्थानिक महिलांनी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. महापालिकेचा कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे काम रखडले असून, खासगी कंपनी आणि केयूडब्ल्यूएस संस्थेकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा मंडळाने दोन दिवसांपूर्वीच पाईपलाईन दुरुस्तीचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कंत्राटदारांनी अद्याप काम सुरू केले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणारी प्रभावी अट करारामध्ये नसल्याने त्यांच्यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.

उद्यापर्यंत पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.