• रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
  • ५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

बेळगाव : समाजातील बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि हॅपीहार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ॲनिमिया तपासणी व जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.

या शिबिरात एकूण ५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तपासणीत ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ लोहयुक्त (आयर्न) गोळ्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान करून योग्य वेळी उपचार सुरू करणे, तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिराचे नियोजन आणि आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन शीला पाटील यांनी प्रभावीपणे केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक तसेच रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आयोजकांनी आभार मानले.

हा उपक्रम रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या सचिवपदाच्या नेतृत्वात पार पडला. बेळगावातील विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी आणि ॲनिमियामुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने अशा समाजोपयोगी उपक्रमांची मालिका भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सांगण्यात आले.