
बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहयोगाने येथील मराठी भाषाप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या यंदाच्या मराठी भाषा निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच समारंभपूर्वक करण्यात आले.
बेळगाव शहर, टिळकवाडी व येळ्ळूर या तीन विभागांत शाळावार या स्पर्धा झाल्या. यामध्ये बेळगांव शहर विभागातून मराठा मंडळ हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, सेंट्रल हायस्कूल व महिला विद्यालय तर टिळकवाडी विभागातून ठळकवाडी हायस्कूल व बालिका आदर्श तसेच येळ्ळूर विभागातून महाराष्ट्र हायस्कूल, चांगळेश्वरी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल व भावकेश्वरी हायस्कूल या शाळांनी यश मिळविले. यश संपादन केलेल्या प्रत्येक शाळेचे तीन विद्यार्थी, मराठी विषय शिक्षक व मुख्याध्यापक यांचा रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा मंडळ हायस्कूल येथे झालेल्या समारंभात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह परशराम माळी, निबंध केंद्रप्रमुख प्रभाकर हलगेकर, बापूसाहेब देसाई, कुमार पाटील, शिवराज पाटील, विलास पेडणेकर तसेच दहाही शाळांचे संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
बेळगांव व टिळकवाडी येथे नितीन कपिलेश्वरकर तर येळ्ळूर येथे बेळगांव संस्था अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांवच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
बेळगांव व टिळकवाडी येथे नितीन कपिलेश्वरकर तर येळ्ळूर येथे बेळगांव संस्था अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांवच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.








