- पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन
- शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपातीची शक्यता
बेळगाव : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, कर्नाटक नागरी पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळ (KUWSDB) आणि एलॲण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. जलाशयातील पाणीपातळी सातत्याने घटत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या राकसकोप जलाशयातून मृतसाठ्यातील पाणी उपसून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वेळेत पाऊस न झाल्यास शहरासमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि एलॲण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जलाशयाची प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २,४४६ फूट इतकी नोंदविण्यात आली असून मृतसाठ्यातील पाणी आणखी दोन फूटांनी कमी झाले आहे. सध्या मोटारींच्या साहाय्याने दररोज २० ते २५ एमएलडी पाणी उपसले जात असून, आवश्यकतेनुसार आणखी दोन मोटारी कार्यान्वित करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जलवाहिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, हिडकल जलाशयातील पाणीपातळी पाच टीएमसीपर्यंत खाली आली असून शेती आणि औद्योगिक वापरासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या जलाशयातून शहरासाठी दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुरवठा कायम ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणि पावसाचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास, शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.








