- सतीश जारकीहोळी यांच्याकडे तीन जिल्ह्यांची धुरा
बेंगळुरू : कर्नाटक सरकारने राज्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंजुरीनंतर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने राज्यातील उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांकडे विविध जिल्ह्यांच्या देखरेखीची विशेष जबाबदारी तातडीने सोपवण्यात आली आहे.
या विशेष शासकीय अधिसूचनेनुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे बेळगाव, धारवाड आणि हावेरी या तीन जिल्ह्यांचे नियंत्रण सोपवण्यात आले असून आगामी काळात अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती उद्भवल्यास मदत आणि बचावकार्यात प्रशासकीय समन्वय साधण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. याच आदेशांतर्गत राज्यातील इतर ज्येष्ठ मंत्र्यांकडेही विविध जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे तुमकुरू आणि चित्रदुर्ग, के. एच. मुनियाप्पा यांच्याकडे बेंगळुरू ग्रामीण, बळ्ळारी आणि विजयनगर तर रामलिंगारेड्डी यांच्याकडे बेंगळुरू दक्षिण आणि मंड्या या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच एम. बी. पाटील यांच्याकडे विजापूर आणि बागलकोट तर के. जे. जॉर्ज यांच्याकडे शिवमोग्गा, चिकमंगळूर आणि दावणगेरे जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे.
अधिसूचनेनुसार इतर जिल्ह्यांमध्ये कृष्ण बैरेगौडा यांच्याकडे बेंगळुरू शहर आणि हासन, ईश्वर खंड्रे यांच्याकडे बीदर आणि गदग तर प्रियांक खर्गे यांच्याकडे कलबुर्गी आणि यादगीर जिल्ह्याची जबाबदारी असेल. याशिवाय डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्याकडे रायचूर आणि कोप्पळ, यु. टी. खादर यांच्याकडे उडुपी, कोडगू, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड तर डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांच्याकडे मैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवून यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.








