बेळगाव : पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त शहापूर येथील गाडेमार्ग बिच्चु गल्ली येथे शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात शिवसंस्कृतीचा वारसा जपत ऐतिहासिक पराक्रमाचे जिवंत दर्शन घडविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ तसेच शिवकालीन युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून नागरिकांसाठी हा विशेष आकर्षण ठरणार आहे.

रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बिच्चु गल्ली कॉर्नर, गाडेमार्ग येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्घाटक म्हणून बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी संपर्क प्रमुख विकास कलघटगी, सुरज जाधव, निलेश काकतकर, सचिन धाडवे, विशाल सावंत, विनायक पाटील, ओमकार बैलूरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर रात्री ८.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाला नागरिकांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.