- ४० फूट उंचीवरून दरड कोसळली ; अनेक जखमी – बचावकार्य सुरू
बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे गुरुवारी पहाटे दगड खाणीत भीषण दुर्घटना घडून सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील मदपट्टणा परिसरातील स्टोन क्रशर प्रकल्पात ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दगड खाणीत काम सुरू असताना सुमारे ४० फूट उंचीवरून मोठा खडक अचानक कोसळला. त्याखाली अनेक मजूर अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातात सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
दुर्घटनेच्या वेळी खाणीत सुमारे १८ मजूर काम करत होते. मृतांमध्ये बिहार आणि आसाम येथील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.








