• चोरीच्या ८ दुचाकी जप्त ; पुढील तपास सुरू

गोकाक : बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत बाईक चोरणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या एकूण आठ मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने ही यशस्वी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गोकाक ग्रामीण पोलीस करत आहेत.