• पुस्तक दान उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य

बेळगाव : ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्र. ४१ मधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेकडून आलेल्या विनंतीला प्रतिसाद देत फाउंडेशनने हा पुस्तक दान उपक्रम राबविला.

विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके पडताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरला. शिक्षण हीच विद्यार्थ्यांना देता येणारी सर्वात मौल्यवान भेट असल्याची भावना यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या आशा जनगौडा, मेघा दुदामी आणि विजय कनेरी यांनी विशेष योगदान दिले. यावेळी ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या सर्व सदस्यांचे योगदान आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. दान करण्यात आलेले प्रत्येक पुस्तक हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले.

पुस्तक दानामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला चालना मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम पुढेही सातत्याने राबविण्याचा निर्धार ‘पाही वाईब्स फाउंडेशन’ने व्यक्त केला.