- श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ‘सेंट मेरीज मेट्रो स्टेशन’ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा श्रीराम सेना हिंदुस्थानने तीव्र विरोध केला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि हमारा देश संघटना यांनी आज सोमवारी सकाळी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव ‘सेंट मेरीज’ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वारशाशी निगडित असल्याने त्यात बदल करणे चुकीचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. कर्नाटकासह देशभरातील लाखो लोकांसाठी शिवाजी महाराज राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, शिवाजी महाराजांनी स्वराज्य, न्याय व सर्व धर्मांच्या रक्षणासाठी केलेल्या लढ्याला सन्मान देण्यासाठी शिवाजीनगरची ऐतिहासिक ओळख जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय प्रतीक बनलेले हे नाव वाद निर्माण करण्याऐवजी भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
निवेदन सादर करतेवेळी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि हमारा देश संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
