बेळगाव / प्रतिनिधी

पावसामुळे बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. सोमवारी आपच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महापालिका आवारात निदर्शने केली. पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. सध्या बेळगावातील रस्त्यांवर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

रस्त्यांच्या कामाचा दर्जा न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देत त्यांनी महापौर मंगेश पवार यांना निवेदन दिले. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि “लवकरात लवकर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल,” असे आश्वासन दिले. यावेळी आपचे युवा नेते जुनैद पाशा म्हणाले की, “बेळगावातील सर्व रस्ते खराब झाले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांच्या कामाचा दर्जा न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, आम आदमी पक्ष येत्या काळात तीव्र आंदोलन करेल आणि आम्ही धरणे आंदोलन करू.