- बेळगाव, म्हैसूर, बेंगळुरूसह सहा ठिकाणी कारवाई एकाचवेळी छापेमारी
- कागदपत्रांची तपासणी सुरू
बेळगाव : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली आहे. बेळगाव, म्हैसूर, बेंगळुरू आणि हसन जिल्ह्यातील आरसिकेरेसह एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित मालमत्ता आणि व्यवहारांशी निगडित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये त्यांच्या परिचित आणि निकटवर्तीयांच्या निवासस्थानांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
कारवाईदरम्यान म्हैसूरमधील एका मित्राचे घर, बेंगळुरूमधील एक अपार्टमेंट, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील निकटवर्तीयाचे निवासस्थान तसेच अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका व्यक्तीच्या घराचीही तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणांहून कागदपत्रे आणि इतर माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.
वाय. मंजुनाथ यांच्यावर बेनामी व्यवहारांच्या माध्यमातून जमीन, बार आणि रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित मालमत्ता उभारल्याचा आरोप असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ईडीकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, बेंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानीही अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून, या कारवाईबाबत ईडीकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.








