• हिडकल धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

बेळगाव : जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हिडकल धरणात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट  केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी यांनी ही माहिती दिली. धरणात अद्याप नव्या पाण्याची आवक सुरू झालेली नसल्यामुळे पाणीसाठा कमी असल्याची भावना निर्माण होत असली, तरी उपलब्ध साठा पुरेसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यासाठी टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी, असेही त्यांनी सूचित केले.

हिडकल धरणातून धारवाडला अतिरिक्त पाणी सोडले जात असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. धारवाडला केवळ औद्योगिक वापरासाठी राखीव असलेले पाणी पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याबाबत विचारणा करण्यात आली असता, तेथील परिस्थितीही सध्या आव्हानात्मक असल्याने अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे कठीण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तळागाळातील समस्यांची अचूक माहिती वरिष्ठ स्तरावर पोहोचत नसल्याचे सांगत, अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.