• दहा वॉर्डांमध्ये सध्या चोवीस तास पाणीपुरवठा
  • पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेचे २८ टँकर्स सज्ज

बेळगाव : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी विविध पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शहरातील ५८ वॉर्डांपैकी १० वॉर्डांमध्ये सध्या २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित ४८ वॉर्डांमध्ये ४ ते ५ दिवसांआड पाणी दिले जात असून, जून महिन्यापर्यंतचे नियोजन आखण्यात आले आहे.

शहराला राकसकोप, हिडकल आणि बसवणकोळ या जलस्रोतांमधून दररोज सुमारे १०५ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील ८४० बोअरवेल्स कार्यरत आहेत. याशिवाय अतिरिक्त ३० खासगी बोअरवेल्स आणि १० खुल्या विहिरींची ओळख पटवण्यात आली असून, गरज भासल्यास त्या भाड्याने घेण्यात येणार आहेत.

पाणीटंचाई तीव्र होणाऱ्या भागांमध्ये तातडीने पाणी पोहोचवण्यासाठी महापालिकेचे २८ टँकर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.