• कपिलेश्वर उड्डाणपुलावर धाग्याने नाकाला दुखापत
  • सहा टाके घालण्याची वेळ

बेळगाव : शहरात पतंगाच्या मांजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून जात असताना मांजाचा धागा अडकल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी बी. आर. नायक गंभीर जखमी झाले. सोमवारी घडलेल्या या घटनेत त्यांच्या नाकाला दुखापत झाली असून, जखमेवर सुमारे सहा टाके घालावे लागले. या घटनेमुळे शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह इतर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

बी. आर. नायक हे कपिलेश्वर उड्डाणपुलावरून जात असताना अचानक मांजाचा धागा त्यांच्या नाकाला अडकला. धाग्यामुळे नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करावे लागले. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक मांजामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना दुखापत होण्याचा धोका वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि वर्दळीच्या ठिकाणी मांजाचे धागे अडकल्याने दुचाकीस्वारांच्या मानेवर, चेहऱ्यावर किंवा नाकावर जखमा होण्याची शक्यता असते. वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांच्या गळ्यात किंवा चेहऱ्यावर धागा अडकल्यास गंभीर अपघातही घडू शकतो. त्यामुळे अशा धोकादायक मांजाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

धोकादायक मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील गर्दीचे रस्ते, उड्डाणपूल आणि दाट लोकवस्तीच्या भागांत विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मांजामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पतंग उडविण्याच्या आनंदासाठी इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याच्या घटनेनंतर तरी प्रशासनाने धोकादायक मांजाच्या विक्री व वापराविरोधात प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.