• मटका – जुगार अड्ड्यांवर छापे ; अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक

बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी अवैध कृत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. खडेबाजार, मार्केट आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घातलेल्या अचानक छाप्यात मटका बुकी, जुगारी आणि गांजाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय ए.वाय.अडगोंड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छत्रपती शिवाजी रोड नाल्याजवळ छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या परशुराम मीनाजी मोरे यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने गजानन गरडा नावाच्या व्यक्तीला पैसे देत असल्याचे उघड केले असून, त्या दोघांविरुद्ध के.पी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावन्नावर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वीरभद्र नगरमधील एका इस्पिक जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी मोशिन खान मुनिर खान पठान, सोहेल मन्सूर मकानदार, हरुनारतीद राजेसाब तिगडी, जाफर सादिक इमियाज घिवाले, मोहम्मदरशिद महंमदनाम बेपारी यांना ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा आरोपी जाफर मिरासाब सनदी हा फरार आहे.

त्याचप्रमाणे, महंतेशनगरमध्ये असामान्य वर्तन करणाऱ्या श्रीकांत मुरगप्पा यक्कुंडीची माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय उदय पाटील यांनी वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या सर्व यशस्वी कारवायांचे कौतुक केले आहे.