- सीसीबीची कारवाई : १०.७७ ग्रॅम हेरॉईनच्या १२२ पुड्या हस्तगत
बेळगाव : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. सीसीबीच्या पथकाने बसवाण गल्ली येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून २ लाख १५ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले. मुंबईतील सायन कोळीवाडा येथून हा अमली पदार्थ आणल्याची माहिती अटक केलेल्या तरुणाने पोलिसांना दिली आहे.
गुरुवारी (१ ऑक्टोबर) सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संदीप विजय अनगोळकर (वय २७, रा. बसवाण गल्ली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून १०.७७ ग्रॅम हेरॉईनच्या १२२ पुड्या जप्त करण्यात आल्या.
मुंबईतील सायन कोळीवाडा येथील अम्मा नावाच्या व्यक्तीने आपल्याला हेरॉईनचा साठा दिल्याचे संदीपने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईहून हेरॉईन आणल्यानंतर विक्रीच्या उद्देशाने त्याने त्याच्या पुड्या तयार केल्या होत्या. हा साठा त्याने बसवाण गल्ली येथील आपल्या घरी ठेवला होता.
या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा खडेबाजार पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप अनगोळकर याच्यासह मुंबईतील सायन कोळीवाडा येथील अम्मा हिच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. बेळगाव शहर आणि तालुक्यात हेरॉईन, पन्नी आणि गांजाची विक्री करणाऱ्यांचे जाळे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.








